Recent

झाशीची राणी लक्ष्मीबाई / Zashichi Rani Lakshmibai

झाशीची राणी लक्ष्मीबाई.................................

कडकडा, कडाडे बिजली, शत्रुंची लष्करे थिजली। मग कीर्तीरूपे उरली, ती पराक्रमाची ज्योत मालवे, इथे झांशीवाली।।
(भा. रा. तांबे)


आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या, संगणकाच्या युगात स्त्री ही उच्चशिक्षित आहे. तरीही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आजही आधुनिक स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले दिसत नाही. मात्र झाशीची राणी ही १९ व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला. आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला.
झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले. वेदकालीन पंचकन्यांइतक्याच श्रेष्ठ असणार्‍या या राणीच्या मृत्यूवर प्रत्यक्ष शत्रूनेही हळहळ व्यक्त केली. अवघ्या २८-२९ वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठ-मोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला. परंतु कोणत्याही संकटापासून माघारी फिरणे त्यांना माहीत नव्हते.
धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या. पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या मनकर्णिका - मनु होत्या. महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणार्‍या मोरोपंत तांबे यांची ही मुलगी! हे मोरोपंत तांबे मूळचे (जळगाव जिल्ह्यातील) पारोळ्याचे. महाराष्ट्रीय माता-पित्यांच्या (वडील-मोरोपंत; आई- भागीरथी बाई) पोटी काशी येथे जन्मलेल्या मनुने, पुढे शूरवीर झाशीची राणी बनून ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून अढळ स्थान प्राप्त केले.
दुसर्‍या बाजीरावांकडे आश्रयाला असणार्‍या मोरोपंतांच्या मनुला मातृसुख लाभले नाही. वयाच्या ३-४ थ्या वर्षीच आई वारल्याने मनु नेहमी आपल्या वडिलांबरोबरच असे. नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे या दुसर्‍या बाजीरावांच्या दत्तक मुलांबरोबरच मनु ब्रह्मावर्त येथे वाढली. मोठे, पाणीदार डोळे असणारी ही मोहक कन्या दुसर्‍या बाजीरावांचीच नव्हे तर सर्वांचीच लाडकी होती. बाजीरावाने तिला स्वत:च्या मुलीसारखे वाढवून लिखाण-वाचनाबरोबरच मर्दानी शिक्षणही दिले. एवढेच नव्हे तर ब्रह्मावर्तामधल्या कार्यशाळेतून, आखाड्यांमधून राणीने अश्र्वपरीक्षा, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदुक चालविणे, पिस्तुले, जांबीया चालवणे यांचेही शिक्षण घेतले. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व झाशीची राणी या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी ‘मल्लखांब’ नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.
राणी लक्ष्मीबाईंचा विवाह १८४२ मध्ये झाला. पेशव्यांच्या वाड्यात बागडणारी मनु झाशीचे राजे गंगाधरराव यांची ‘राणी लक्ष्मीबाई’ झाली. ‘राणी’ पदाच्या कसोटीला लक्ष्मीबाई पूर्णपणाने उतरल्या. झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.
दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमीत सुरू ठेवली. एवढेच नव्हे तर कनिष्ठ समजल्या जाणार्‍या सर्वसामान्य वर्गातील महिलांनाही तिने घोडेस्वारी, तलवारबाजीत पारंगत केले. या गोष्टीचा फायदा ब्रिटिशांनी झांशीवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी झाला. घोडदळ-सैन्यातील महिलांचा वावर, दारुगोळ्याची ने-आण करणार्‍या महिला, एवढेच नव्हे तर तोफगोळ्यांची गोलंदाजी करणार्‍या महिला पाहून सर ह्यूज रोज हा इंग्रजांचा सेनापती आश्चर्यचकीत झाला होता. लक्षात घ्या, ही घटना आहे १८५७-५८ ची.
लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणार्‍या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले. राज्य करण्यासाठी आपण समर्थ आहोत हे सिद्ध करण्यासाठीच त्यांनी गंगाधर रावांच्या निधनानंतर स्वत:च्या नावाची (उर्दू भाषेतील) मोहोर करून घेतली. त्या काळात उर्दूमधे मोहोर असणे याचा अर्थ ‘सत्ताग्रहण आणि राजमान्यता’ असा होता.
राणीला एक मुलगा झाल्याने संपूर्ण झाशी शहर आनंदीत होते. परंतु मुलगा तीन महिन्याचा असतानाच मरण पावला. परिणामी मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दु:खी झाले दत्तकपुत्र वारसा हक्कासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन ‘दामोदर’ असे नाव ठेवण्यात आले. पण दुर्दैवाने थोड्याच अवधीत गंगाधर रावांचे निधन झाले. (१८५३)
पूर्वीपासून झांशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वत: इस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात-झांशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानात लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्र्वास वाटेल का, अशी शंका व्यक्त करून-ब्रिटिश सरकारला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार, अनैतिक कृत्यांना, कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणार्‍या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या. हे धारिष्ट दाखविल्यामुळेच त्यांना स्वातंत्र्यदेवता म्हटले गेले.
परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झांशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने ‘मेरी झांसी नही दूँगी’ असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.
झांशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पद्च्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते. अर्थातच ही शांतता वादळापूर्वीची होती.
१८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मण रावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मण रावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वत:बरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.
अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वत:ही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.
दरम्यान २१ मार्च, १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.
उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने - आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.
शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वत:च्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या,आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले.
लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’
या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जूनला (१८५८) सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरीत हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. परिणामी मागून आलेल्या सैन्याने राणींना जखमी केले. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली आणि एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले. विजेसारखेच त्यांचे आयुष्य कडकडाट करून, दिव्यत्वाचा लख्ख प्रकाश देऊन गेले.
केवळ २७ वर्षांच्या या निर्भय, पराक्रमी, तेजस्वी, प्रत्यक्ष भवानीचे रूप असणार्‍या लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली होती. ब्रिटिशांनी राणींचा उल्लेख `हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या.

``रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली।।''
_______________________________________________________________________________

Labels

history of maharashtra (54) maharashtra (52) संत (15) समाजसुधारक/ Social Activist (14) महाराष्ट्रातील संत / maharashtratil sant (13) साहित्यिक (13) लढवय्ये / warriors (11) राजकारण / Political Peaoples (7) marathi (6) अभिनेते / Marathi Actors (6) maharashtra politics (5) sant muktabai (3) mahatma fule (2) महाराष्ट्रातील संत /maharashtratil sant (2) Ahmednagar (1) Anna Hajare (1) Dr. babasaheb ambedkar (1) Krantisinh Nana Patil (1) Medha Patkar (1) Udayanraje Bhosale (1) ahilyabai holkar (1) baba aamte (1) bahinabai (1) bajirav peshave (1) balasaheb thakre (1) bhagvan baba (1) cricket (1) indian cricket team (1) kusumagraj (1) nevasa (1) ramdas swami (1) sachin tendulkar (1) saibaba shirdi ke sai baba (1) sant dnyaneshwar (1) sant namdev (1) sant tukaram (1) savata maharaj (1) savitribai fule (1) shivsena (1) tatya tope (1) खेळाडू (1) छत्रपती शिवाजी महाराज / Shivaji Maharaj (1) झाशीची राणी लक्ष्मीबाई / Zashichi Rani Lakshmibai (1) तानाजी मालुसरे / Tanaji Malusare (1) दादा कोंडके/ Dada Kondake (1) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज/ sambhaji maharaj (1) महर्षी धोंडो केशव कर्वे / Maharshi Dhondo Keshav Karve (1)